पिंपरी : मावळातील फॉक्सॉन कंपनी गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण तापले असताना पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक सुखद वार्ता आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरीत नवीन कंपन्या येण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपीनीने पिंपरी वाघेरेमध्ये २५ एकराचा औद्योगिक भूखंड खरेदी केला आहे. त्यामुळे रोजगार वाढणार असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असा औद्योगिक परिसर विकसित झाला आहे.
पायाभूत सुविधा, परवडणारी घरे, प्रशिक्षित मनुष्यबळामुळे औद्योगिकनगरीत बहुराष्ट्रीय कंपन्या पसंती देत आहे. तसेच शहरालगतच हिंजवडी आणि तळवडेतील आयटी पार्कमुळे, ऑटो आणि आयटीपार्कमुळे शहराचे नाव जगाच्या नकाशावर पाहोचले आहे. त्या मायक्रोसॉफ्टची भर पडणार आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रिज आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनमध्ये ३२८ कोटी ८४ लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. लीज ट्रान्स्फर पद्धतीने हा भूखंड मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. पिंपरी वाघेरे येथे १०.८९ लाख चौरस फूट (सुमारे २५ एकर) औद्योगिक भूखंड विकत घेतला आहे. लीज ट्रान्स्फर पद्धतीने हा भूखंड मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशनने घेतला असून या व्यवहारात मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनाचा तिजोरीत १६ कोटी ४४ लाख रुपयांचा महसुल जमा झाला आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
रोजगार वाढणार?
जागतिक पातळीवरील नामांकित मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे. १९० देशात २ लाख २५ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच देशात पुणे, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चैन्नई, नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, हैदराबाद, कोची, कोलकात्ता आदी ११ ठिकाणी कार्यालये आहेत. त्यात देशभरातील ८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कंपनीने जागा घेतल्याने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.