पिंपरी : शहरामध्ये पावसाला सुरूवात झाल्यापासून डेंग्यू रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे वैद्यकीय विभागासह आरोग्य विभागाचा ताण वाढला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यामध्ये पाण्याचे डबके साचल्याने त्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते. परिणामी शहरामध्ये पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पिंपरी चिंचवड शहर देखील याला अपवाद ठरले नाही. जून महिन्यामध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. जानेवारी ते जून या दरम्यान शहरात एकाही डेंग्यूबाधित रुग्णाची नोंद झाली न्वहती. मात्र जुलै महिन्यामध्ये ३६ रुग्णांना लागण झाल्याने वैद्यकीय विभागाचा ताप वाढला. ही आकडेवारी पुढे वाढतच गेली. ऑगस्टमध्ये ५२, सप्टेंबर ६०, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ८१ रुग्णांची नोंद झाली. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यामध्ये तब्बल २२९ जणांना डेंग्यूची लागण झाली. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या २४ दिवसांमध्ये बाधितांची संख्या कमी झाली आहे. या २४ दिवसांमध्ये १९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू रुग्णांचा वाढता आलेख खाली आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
असे असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच परिसरात कुठे पाण्याचे डबके साचले असले तर ते नष्ट करावे. तसेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या मनपा दवाखान्यात तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक ८१ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र या महिन्यामध्ये हा आकडा कमी होत आहे. पावसाळा संपल्यानंतर डेंग्यूबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्या परिसरात डासांची पैदास होणार नाही याकडे लक्ष द्यावे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.