कामशेत : स्त्रीला समाजाने कायम प्रतिष्ठेची वागणूक द्यावी. समाजाला स्त्रियांची मोठी आवश्यकता आहे. त्यांच्या कर्तृत्वाने चांगला समाज घडतो. त्याचेच ऋण म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने स्त्रियांना आदराचे स्थान देऊन प्रतिष्ठेची वागणूक दिली पाहिजे, असे मत निवृत्त पोलीस अधिकारी व महिला पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्वर साबळे यांनी व्यक्त केले. येथील काम्बेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हॉस्पिटलच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्या वेळी ते बोलत होते. सरपंच सारिका रमेश शिंदे, जैन स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती अरडे, महिला हवालदार एस. व्ही. पाटील, ट्रस्ट अध्यक्ष व हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकेश मुथा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष साबळे म्हणाले, की शहरी भागातील झोपडपट्टी व ग्रामीण भागात महिलांवर खूप अन्याय होतो. महिलांच्या जिवासही धोका होतो. त्यासाठी समाजाने महिलेकडे प्रतिष्ठेने पाहून तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.सरपंच शिंदे, मुख्याध्यापक अरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी कार्यकर्त्या लतिका जगताप, कष्टकरी महिला सखुबाई भानुसगरे, पूजा गाढवे, ज्योती शेडगे, वैशाली ढिले, प्रियंका शिनगारे, आशाबाई गायकवाड, श्वेता खंडाते, निर्मला जैन आदी कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त महिलांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नीलेश मुथा, नेहा ओव्हाळ, गणेश भोकरे, संजय कुलकर्णी, सुषमा पटेल, वनिता वाघवले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार वनिता वाघवले यांनी मानले. (वार्ताहर)
स्त्रियांच्या कर्तृत्वाने घडतो चांगला समाज
By admin | Published: March 26, 2017 1:47 AM