पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. शहरातील विविध हॉटेलमध्ये ग्रुपने आलेले तरुण, तरुणी यांनी तर चक्क केक कापून नववर्षाचे स्वागत केले. हॉटेलांमध्ये आयोजित कार्यक्रमात डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकली. मद्याचे पेग रिचवून अनेकांनी थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन केले.हिंजवडी, आयटी पार्क परिसरातील हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने वाकड, हिंजवडी, ताथवडे परिसरातील हॉटेल, गार्डन रेस्टॉरंट रोषणाईने उजळून निघाली. हॉटेलवाल्यांनी थर्टी फर्स्टसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या असल्याने काहींनी कुटुंबासह, तर काहींनी मित्रमंडळींसह ग्रुप बुकिंग केले होते. हॉटेल व्यावसायिकांनी विशेष आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. त्यास ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनमुळे रस्त्यांवर गर्दी होणार, पोलिसांकडून वाहन तपासणी या कटकटी नकोत म्हणून काहींनी कुटुंबासह घरीच नववर्षाचा आनंद घेतला. दूरचित्रवाहिनीवर नववर्षाच्या निमित्ताने सुरू असलेले कार्यक़्रम पाहत जेवणाचा विशेष मेनू ठरवून घरीच कुटुंबातील सर्वांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. बाहेर गर्दीत जाणे अनेकांनी टाळले.या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पोलिसांकडून हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेनेही थर्टी फर्स्टच्या निमित्ताने यंत्रणा सज्ज ठेवली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ठिकाणी तपासणी नाके निश्चित केले होते. शहरात प्रवेश करण्याच्या आणि शहराबाहेर पडण्याच्या मार्गावर प्रमुख ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांची, वाहनचालकांची तपासणी सुरू होती. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी बे्रथ अनालायझर यंत्राच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली जात होती.बालचमूंनीही केले नववर्षाचे स्वागतनववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमाची तयारी बालचमूंनी ते राहत असलेल्या सोसायट्यांमध्ये केली होती. पाच ते दहा रुपयांची वर्गणी जमा करून त्यांनी खाऊ आणला. बालचमू मित्र मंडळींनी एकत्रित येऊन त्यांच्या पद्धतीने नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला.नविन वर्षाचे स्वागत करताना मित्र सोबत असतील तर त्याचा आनंद निराळाच असतो. असाच आनंद अनेकांनी साजरा केला.नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये याकरिता पोलीस दल रात्री डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत होते. आवाहन केल्याप्रमाणे वाहतूक पोलीस जागोजागी नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी करीत आहेत. यासोबतच ब्रेथ अनालायझरच्या माध्यमातून ड्रंक अॅन्ड ड्राइव्हचीही कारवाई सुरु होती, असे निगडी विभागाचे पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सांगितले.सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावपिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्यक्ष भेटगाठ घेऊन शुभेच्छा देणे शक्य होत नसले, तरी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देण्यास प्राधान्य देण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव सुरू आहे.पूर्वी शुभेच्छा पत्रांद्वारे शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्याची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. मोबाइलवरून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देणे अधिक सोईचे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला. शनिवार, रविवारी अशाप्रकारे दोन दिवस अगोदरपासूनच शुभेच्छा संदेश मोबाइलवर धडकत होते. यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासह सामाजिक भान जपणारे संदेशही पाठविण्यात आले.स्वत:चा फोटो व त्या शेजारी मेसेज टाइप करण्यासह विविध प्रकारची रंगसंगती असलेले मेसेज पाठविण्याचे प्रमाण अधिक होते. यासह छोटासा व्हिडीओ तयार करून त्याद्वारेदेखील चांगल्या प्रकारचे मेसेज पाठविले जात होते.नववर्षाच्या स्वागताची तयारी चार दिवस अगोदरपासून सुरू होती. कशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत करायचे याबाबतचे नियोजनही केले जात होते. त्यानुसार नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रविवारी रात्री करण्यात आला. अनेकांनी हॉटेलमधील पार्टीत सहभागी होत जल्लोष केला, तर काही जणांनी घरीच छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करीत नववर्षाचे स्वागत केले. याचबरोबर शुभेच्छाही देण्यात आल्या.आठवणींना उजाळाकाही जणांनी जुन्या आठवणींनाउजाळा देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मित्र-मैत्रिणींसमवेत वर्षभरातीलविविध आठवणी शेअर करीत शुभेच्छा देण्यात आल्या.उत्साह वाढविणारे संदेशनव्या उमेदीने नववर्षाचे स्वागत करू, नवीन संकल्प करू, असे एकमेकांचा उत्साह वाढविणारे संदेशही पाठविले जात होते. अशाप्रकारचे संदेश पाठविणाºयांचे प्रमाण अधिक होते.पोलीस रस्त्यावरमद्याच्या अमलाखाली कोणी मोटार चालवू नये, अशा सूचना रस्त्यावर ठिकठिकाणी थांबलेले पोलीस कर्मचारी वाहनचालकांना देत होते. मद्याच्या अमलाखाली वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते. आनंदोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करा, असे पोलीस आवर्जून सांगत होते. यामुळे घरातच थर्डी फस्ट साजरा केला जात होता.
गुडबाय २०१७ अन् वेलकम २०१८! हॉटेलांमध्ये रात्री उशिरापर्यंत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:38 AM