पिंपरी : पिंपळे गुरव येथे रविवारी खूनी हल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांत एकूण सहा जण जखमी झाले आहेत, तर एकूण चौदा आरोपींवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपळे गुरव येथे झालेल्या पहिल्या घटनेत फिर्यादी शनिवारी (दि. १६) रात्री अकराच्या दरम्यान मित्रांसह पिंपळे गुरव परिसरात फिरत होते. काशिदनगर येथून जात असताना आरोपींनी त्यांना थांबविले. जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच टोळक्याने राज पाटील (रा. पिंपळे गुरव), किशोर काटे, मतीन शेख, अभिषेक बारटक्के ((सर्व. रा दापोडी) यांच्यावर कोयता व पालघनने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. किशोर काटे याच्या दुचाकीचे देखील नुकसान केले.
या घटनेप्रकरणी दीपक लुंडा कोकाटे (रा. साठ फुटी रोड, मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार विशाल उर्फ कांड्या पप्या काशीद , सचिन उर्फ टकल्या मेजर कोळेकर, शाम हिंगे, प्रसाद सोनटक्के, दीपक बागडे, पप्प्या गायकवाड, मनोज सरकार, भावेश सरकार, प्रसाद कदम, खडया साळुंके (सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत दोन तरुणांवर तीन जणांनी कोयता, फायटर, सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला. यात रोहित डॅनियल तोरणे (रा. ओंकार कॉलनी, नवले चौकाजवळ, पिंपळे गुरव) व त्याचा मित्र निलेश पत्री गंभीर जखमी झाले आहेत. रोहितने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम सावंत (रा. दापोडी), प्रमोद भोसले, जोसेफ, तेजस यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित व निलेश रविवारी (दि. १७) मध्यरात्री घराजवळ बसले होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. आरोपी शुभम याने निलेश पत्री यांच्यावर कोयत्याने वार केला. दरम्यान, रोहित घाबरून पळून जात असताना शुभमने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. तसेच जोसेफ व तेजस यांनी त्या दोघांना फायटरने तर प्रमोद भोसलेने सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.