पिंपरी : केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी निर्धार परिषदेत व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगार पंचायत संघटनेतर्फे असंघटित कष्टकरी कामगारासांठी आयोजित निर्धार परिषदेत वैद्य बोलत होते. या वेळी व्यासपीठावर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, कष्टकरी कामगार पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या भागातील विविध कामगार संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. वैद्य म्हणाले, विविध क्षेत्रांतील कामगारांना आज दैनंदिन जीवन जगणेदेखील अवघड झाले आहे. अनेक वर्षांपासून मागणी असूनदेखील त्यांच्या घरांचा, नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही. अशा प्रकारे एकीकडे कामगारांवर अन्याय होत असताना, दुसरीकडे मात्र, उद्योजकांना करामध्ये सवलती देण्यात येत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत. सरकारने चलनातून हजार -पाचशेच्या नोटा रद्द केल्याने, याचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. सकाळपासूनच नागरिक त्यांच्याकडील तुटपुंजी रक्कम बदलण्यासाठी बँकांसमोर रांगा लावत आहेत. या रांगेमध्ये टाटा, बिर्ला, नसून, गरीब माणूसच असल्याने हे कसले अच्छे दिन आले?. घरांच्या किमती वाढल्याने कोणी फुटपाथवर, तर कोणी झोपडीत राहत आहे. औषधांच्या किमती वाढल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. शिक्षणासाठी लाखो रुपये डोनेशन लागत असल्याने कामगारांना मुलांना शिकवणेही कठीण झाले आहे. नोकरी मिळणे अवघड झाले असून, मिळाली तर ती कायमस्वरुपाची मिळत नाही. शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मागण्या मान्य करण्यासाठी एकजुटीने येऊन लढा दिल्यावरच मागण्यांचा विचार होणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही
By admin | Published: November 18, 2016 4:41 AM