पिंपरी : केंद्र गोरगरिबांसाठी कार्य करत आहे. मुद्रा योजनेचा लाभ तेरा कोटी नागरिकांना झाला आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते. अपंगांना 'दिव्यांग' नागरिक म्हणून संबोधण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी आकुर्डीत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालय व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील साई उद्यानात शहरातील तीनशे अकरा दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाजपच्या प्रदेशच्या नेत्या उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, पालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण अष्टीकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते. शुक्ला म्हणाले, देशातील पाच कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस दिला आहे. उर्वरित, तीन कोटी जनतेला देखील गॅस देण्यात येणार आहे. देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या सूचना अर्थ मंत्रालयाने बँकाना दिल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने बँकांना तब्बल दोन लाख कोटी रुपये दिले आहेत. भाजप सरकारने चार वर्षात देशाचा गौरव वाढविला. जगात भारताचे नाव अभिमाने घेतले जाते. देशाचे पैसे घेऊन काही लोक पळून गेले. परंतु, या लोकांना सत्ताधारी पक्षाचे नव्हे तर युपीए सरकारच्या राजवटीत पैसे दिले गेले आहेत. हे सगळे विरोधकांचे पाप असून आजही आम्ही ते धुण्याचे काम करत आहोत.खासदार साबळे म्हणाले, ''दिव्यांगांचे जीवन सुखी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनाने दिव्यांगाना मोठा आनंद होईल. अपंगत्व येऊन देखील दिव्यांग नागरिक आनंदाने आयुष्य जगत आहेत. आमदार जगताप म्हणाले, औद्योगिकनगरी, श्रीमंत महापालिका म्हणून ओळख आहे. दिव्यांग नागरिकांना पेन्शन देणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. दिव्यांग नागरिकांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन योजना १८ वर्षाखालील मुलांना देखील लागू आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गोरगरिब नागरिकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रयत्न करावेत.
सरकार दिव्यांगांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नशील : शिवप्रताप शुक्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:04 PM
दिव्यांग व्यक्ती ह्या त्यांच्या कार्याने आपले कर्तृत्व सिद्ध करतात. आपण त्यांचे सहकारार्थी होण्यात खूप मोठा आनंदी आहे. आत्ताचे सरकार हीच भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत आहे.
ठळक मुद्देतीनशे अकरा दिव्यांगांना दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप. दिव्यांग नागरिकांना पेन्शन देणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका