पिंपरी : निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे सचित्र वृत्त गुरुवारी लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने तातडीने ग्रेड सेपरेटरमधील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. ग्रेड सेपरेटरमध्ये सोमवार आणि मंगळवारी या दोन दिवसांत लागोपाठ दोन अपघात झाले. हे दोन्ही अपघात पिंपरीतील बँक आॅफ इंडियासमोर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. याठिकाणचे दोन्ही खड्डे वाहनाच्या दोन चाकांच्या अंतरातच पडले होते. त्यामुळे चालकाला खड्डा चुकविणे शक्य होत नव्हते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अचानक वाहन थांबविण्याच्या प्रयत्नात एकाच ठिकाणी दोन दिवसांत दोन अपघात झाले. या घटनांमुळे वाहनचालकांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर ग्रेड सेपरेटरमधील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. चिंचवड स्टेशन, पिंपरी, खराळवाडी येथील खड्डे बुजविण्यात आले. (प्रतिनिधी)सकाळपासूनच खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. बाजूच्या भिंतींमधून येणाऱ्या पाण्यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये खड्डे पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ग्रेड सेपरेटरवर पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह, ग्रेड सेपरेटरमधून जाताना चालकांनी चाळीसशी वेगमर्यादा पाळावी, असे फलक लावलेले आहेत. मात्र, अनेक चालकांकडून वेगमर्यादा पाळली जात नाही. - डी. डी. पाटील, उपअभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका
ग्रेड सेपरेटरचे खड्डे बुजविले
By admin | Published: November 27, 2015 1:29 AM