पिंपरी : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे सांगवी फाट्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री दहा वाजता सांगवी फाट्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे आगमन झाले. यावेळी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड ग्रामस्थांनी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला. तसेच मोबाईलचे टॉर्च लावत त्यांचे स्वागत केले. पदयात्रेला तब्बल दहा तास उशीर झाला.
मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबई येथे आंदोलनासाठी निघाले आहेत. बुधवारी पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज त्यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. यावेळी सकल मराठा समाज व विविध संस्था व संघटनांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘एक मराठा लाख मराठा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण ज्येष्ठ नागरिकांनी ही सहभाग घेतला आहे.
शहरातील सांगवी फाटा ते निगडी या पदयात्रेच्या मार्गावर विविध संघटनांच्या वतीने खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी चहा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग व खाजगी रुग्णालयांमार्फत मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बीआरटी मार्ग भगवामयपद यात्रेमध्ये सहभागी आंदोलकांनी गाड्यांना भगवे झेंडे लावले आहेत. तसेच भगव्या टोप्या व उपरणे परिधान केले आहेत. त्यामुळे औंध रावेत बीआरटी मार्ग संपूर्ण भगवामय झाला.
स्वागतासाठी हजारो तरुण रस्त्यावरपुणे शहरातून सांगवी फाट्यावर अकरा वाजता पदयात्रा येणार होती. मात्र ही पदयात्रा शहरात पोहोचण्यास रात्रीचे दहा वाजले. मात्र सकाळपासूनच औंध- रावेत बीआरटी मार्गावर तरुणांनी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही गर्दी वाढली. पदयात्रा उशिरा पोहोचली तरी तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता.