पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त त्यांच्या हाताखाली काम करणा-या दुय्यम अधिका-यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिकार सोपवू शकतात. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी काही अधिका-यांना प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान केले आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने काही अधिकार नव्याने प्रदान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ केली आहे.कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कर्मचाºयांच्या दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, चौकशी अधिकारी नेमणूक करणे, नियुक्ती किंवा पदोन्नती नियमित करणे, तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार, अनुकंपा तत्त्वावर वारस नियुक्तीबाबत मान्यता देण्याबाबतचे प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत.महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि नागरी सेवा नियुमानुसार, ब, क आणि ड श्रेणी संवर्गातील दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, सादरकर्ता व चौकशी अधिकारी नेमणूक, परीविक्षाधीन कालावधी वाढविणे, नियुक्ती- पदोन्नती आदी प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत.
सहायक आयुक्तांच्या अधिकारात वाढ , प्रशासकीय अधिकार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:39 AM