पिंपरी: वाढत्या टाळेबंदीमुळे उद्योगांची चाके अजून खोलात रुतत आहेत. सूक्ष्म, लघू उद्योगांना त्याचा तीव्र फटका बसत असून, मोठ्या उद्योगांनाही आता झळ बसू लागली आहे. मार्च २०२० पासून टाळेबंदी आणि निर्बंधाचा सामना उद्योग आणि व्यवसाय करत आहेत. उद्योगनगरीत भोसरी, तळेगाव आणि चाकण या औद्योगिक वसाहती आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून पूर्णपणे सावरले नसताना दुसऱ्या लाटेने जोरदार तडाखा दिला.
अत्यावश्यक सेवा आणि उत्पादने, निर्यात करणारे उद्योग सोडून इतर उत्पादन करणारे उद्योग बंद आहेत. तसेच उद्योगांना प्लेट्स, बार, ऑइल, यंत्राचे सुटे भाग पुरविणारी दुकानही बंद आहेत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचे बंधन असल्याने स्टील कटिंग करण्यात अडचण येत आहे. कोरोनाच्या भीतीने कष्टाची कामे करणारा परप्रांतीय मजूर गावी गेला आहे. त्याच बरोबर देशभर बंद असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणितही विस्कळीत झाले आहे. टाळेबंदीचा प्रत्येक दिवस उद्योग आणि उद्योगांच्या अडचणीत वाढ करीत असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
भोसरी, तळेगाव, चाकण एमआयडीसीत दहा हजारांच्या आसपास कंपन्या आहेत. सर्व ठिकाणी ५० ते ६० टक्के क्षमतेने काम सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून दिवस-रात्र तीन पाळीमध्ये (शिफ्ट) काम चालत होते. तिथे आता एका पाळीचे काम सुरू आहे. अनेकदा कामगारांना जास्तीचे काम करावे लागत होते. आता तितके काम राहिले नाही. काहींकडे उत्पादने तयार आहेत मात्र विक्री नाही. थोडीफार मागणी असणाऱ्यांना ऑक्सिजन आणि कच्चा माल उपलब्ध होत नाही.
भारती लघु उद्योग अध्यक्ष दीपक फल्ले म्हणाले, गेल्या चौदा महिन्यांपासून उद्योग टाळेबंदी आणि इतर निर्बंधाचा सामना करत आहे. मागणी आणि पुरवठा याचे गणित विस्कळीत झाले आहे. मजूर आपापल्या गावी गेले, हाती असली थोडीफार मागणी पूर्ण करण्यासाठी कच्चा माल मिळत नाही. येणार प्रत्येक दिवस उद्योगांच्या अडचणीत प्रचंड वाढ करणारा आहे.
उद्योजक जयंत कड म्हणाले, टाळेबंदीमुळे जवळपास साठ टक्के उत्पादन कमी झाले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने मोठे काम बंद आहे. कोरोनाच्या भीतीने परप्रांतातील जवळपास चाळीस टक्के मजुरांनी स्थलांतर केले आहे. अशा स्थितीमुळे उद्योजकांमध्ये नैराश्याची भावना तयार होत आहे.