लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ, मुळशी परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत १०८ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेर १५१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरण साठ टक्के भरले आहे. संततधारेमुळे धरणांची पाणीपातळी वाढली आहे. या पावसाळ्यात एका दिवसात सर्वाधिक पाऊस म्हणून १३० मिमी पावसाची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड परिसराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही काही कालखंड समाधानकारक पाऊस पडलेला नव्हता. पाणीसाठा २० टक्क्यांवर गेल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर लॉबीसाठी कपात केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. जनआंदोलन उसळू नये या भीतीने सत्ताधाऱ्यांनी समयसूचकता दाखवून जूनच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस झाल्यानंतर दिवसाआड पाणीकपात मागे घेतली. नियमितपणे केवळ दहा टक्के पाणीकपात कायम ठेवली. गुरुवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आठवडाभर सलगपणे पाऊस सुरू आहे. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. गुरुवारपासून पाऊस सुरू झाला आहे. दिवसभर संततधार आहे. रविवारी २४ तासांत एकशे आठ मिमी पावसाची नोंद झाली. पवना परिसरात एक जूनपासून पंधराशे मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाण्यात ३९ टक्के वाढ, नदी पातळीत वाढ धरणाच्या पाणीसाठ्यात ४८ दिवसांत धरणात ३९ टक्क्यांनी वाढ झाली. मावळातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे शहर परिसरातील पवना, इंद्रायणी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने लोणावळ्यातील भुशी डॅम, खंडाळ्यातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती.तीन दिवसांत ३३९ मिमी पाऊस-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलायेळसे : चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पवना धरण रविवारी सायंकाळी पाचपर्यंत ६० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धबधबे व ओढे-नाले ओसंडून वाहत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पवना धरणामध्ये गतवर्षी हा साठा ४८.९२ टक्के होता. सध्या उपयुक्त साठा ५.१७१ टीएमसी असून, दिवसभरात ३२ मिमी पाऊस झाला आहे. एक जूनपासून १५५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. लोणावळ्यात ४२१ मिमी पाऊसलोणावळा : घाटमाथ्यावरील मावळ तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच काही दिवस कायम राहिल्यास धरण शंभरीच्या जवळपास पोहचेल, असा विश्वास स्थानिक व्यक्त करीत आहेत. पवना धरणासह लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे तुंगार्ली व वलवण धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. लोणावळ्यात तीन दिवसांत ४२१ मिमी, तर पवन धरण परिसरात ३३९ मिमी पाऊस झाला आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता.
संततधारेमुळे धरणसाठ्यामध्ये वाढ
By admin | Published: July 17, 2017 4:11 AM