पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मावळ तालुक्यातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:08 PM2020-06-05T16:08:12+5:302020-06-05T16:08:56+5:30
निसर्ग चक्रीवादळ व पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश
वडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे असे मत मावळ तालुक्यात नुकसानी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व्यक्त केले.
मावळ तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांत निसर्ग चक्रीवादळ व पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अतोनात नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा अजित पवार यांनी शुक्रवारी केला. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र माळी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्यासह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
आंबी एमआयडीसी परिसरात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी घरावरील, शाळेवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात फुलशेती आणि अन्य शेतीसाठी पॉलिहाऊस वापरले जातात. या वादळात पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे.
शनिवारी दि. ६ रोजी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाणार आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही पवार म्हणाले.