पिंपरी : शहरातील पूरपरिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी धावता आढावा घेतला. पिंपळेनिलख येथील शाळेत स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेतली. वाकड, कस्पटेवस्ती, पिंपळेनिलख परिसराची पाहणी केली. पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, संदिप कस्पटे, आरती चौंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड उपस्थित होते. यावेळी तुषार कामठे आणि कस्पटे यांनी पुर परिस्थितीची व मदतकार्याची माहिती दिली. तसेच मुळा नदीचे खोलीकरण करुन सिमाभिंत बांधण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी मुळानदीच्या बाजूला सीमा भिंत बांधणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर तातडीने सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. पावसाचा जोर ओसरला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धैमान घातल्याने नदीला महापूर आला होता. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रुग्णालयामध्ये देखील पाणी शिरले आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरण केले आहे. आज पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी आली आहे.
भाजपाच्या नगरसेवकांच्या परिसराला पालकमंत्र्यांची भेटपालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असणाऱ्या भागातच पालकमंत्री पाहणीसाठी गेले होते. वाकड परिसरातील पूरग्रस्तांना त्यांनी भेट देणे अपेक्षित होते. मात्र, पूरग्रस्तांचे प्रश्न जाणून घेण्यातही पालकमंत्र्यांनी राजकारण केले. वाकड परिसरातीही पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.