पिंपरी - बारावीत शिकत असलेल्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या आरोपीने दोन गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने विद्यार्थ्याला गोळी लागली नाही किंवा कोणतीही दुखापत झाली नाही. सांगवी येथील पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अल्पवयीन मुलाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोशन सोळंकी व चैतन्य कदम असे आरोपींची नावे आहेत. दहावीपर्यंतच्या शिक्षण घेत असताना फिर्यादी मुलगा व आरोपींची संबंधित हायस्कूलमध्ये ओळख झाली होती. फिर्यादी मुलापेक्षा आरोपी वयाने मोठे आहेत. तसेच नापास झाल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले आहे.
सांगवी येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी त्याच्या मित्रासह पिंपळे गुरव येथे ‘फ्री वाय-फाय’ वापरून मोबाइल फोनवर ‘टिक-टॉक’ व्हिडीओ पहात उभे होते. त्यावेळी नऊच्या सुमारास आरोपी रोशन व चैतन्य दुचाकीवरून तेथे आले. चैतन्य दुचाकी चालवित होता तर रोशन त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसला होता. फिर्यादी मुलाजवळ आल्यानंतर चैतन्य याने दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी रोशन याने त्याच्या कमरेचे पिस्तूल काढून ‘‘हम ही यहॉके भाई है, यहॉ सिर्फ हमारा चलेगा’’ असे बोलून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर गोळी झाडली. फिर्यादी तेथून बाजूला झाल्याने त्याला गोळी लागली नाही.
मोठा आवाज होऊन गोळी तेथील ड्रायक्लिनरच्या दुकानातील काऊन्टरच्या काचेला लागली. त्यामुळे काच फुटली. लागलीच पुन्हा रोशन याने दुसरी गोळी फिर्यादीच्या दिशेने झाडली. मात्र फिर्यादी मुलाने ती गोळी देखील चुकवली. या गोळीबारामुळे फिर्यादी व त्याचा मित्र घाबरून तेथून पळून गेले. या गोळीबारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. येथील दुकानदारांनी तसेच रहिवाशांनी त्यांची दुकाने आणि घरे लागलीच बंद करून घेतले. आरोपींना अडविण्यास कोणीही पुढे आले नाही. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून निघून गेले. सांगवी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.