पिंपरी : अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी, आळंदी फाटा येथून ३ लाख ४० हजार ९३५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली असून, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर (वय ३६, अन्न व औषध प्रशासन विभाग, सह आयुक्त कार्यालय, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रंजन बजानंद गिरी (रा. बालाजीनगर, चाकण) आणि अंकुश गुप्ता (पूर्ण नाव, वय, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला यांचे उत्पादन, साठा, वितरण व वाहतूक करण्यावर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी त्यांच्या ताब्यात ३ लाख ४० हजार ९३५ रुपये किमतीचा गुटका बाळगला. अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा गुटखा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे गिरी आणि गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.