लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची जागा विविध विकासकामांसाठी खरेदी करण्यात येणार असून, एचएची ५९ एकर जागा बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान या उद्देशासाठी आरक्षित करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. पिंपरी-नेहरूनगर रस्त्यावर ७० एकर जागा एचए कंपनीच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी तोट्यात आणि कर्जबाजारी आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या मालकीची जमीन खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. ५९ एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांना योग्य वाटतील अशा सशर्त अटी-शर्तीवर विकण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जमीन विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही जागा सार्वजनिक सुविधांसाठी पिंपरी महापालिकेला मिळावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. एचएची जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. प्रदर्शन, सर्कस, लोक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक, व्याख्यानमाला, संगीत रजनी, राजकीय सभा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन, वाहनतळ, हेलिपॅड आदींसाठी या जागेचा उपयोग करता येईल. दहा टक्के क्षेत्र महापालिकेचे प्रशासकीय कार्यालय, असणार आहे.
महापालिका घेणार एचएचा भूखंड
By admin | Published: June 21, 2017 6:27 AM