पिंपरी : जुने भांडण मिटवण्यासाठी बोलावून पिस्तूल सारखे हत्यार, चॉपर, फायटरने मारून कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत माजवली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नेहरूनगर येथे गुरुवारी (दि. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुरज जैसवाल, रोहित भालेराव, रॉबिन सिंग (तिघे रा. नेहरू नगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह किरण जैसवाल, रोहित कसबे (दोन्ही रा. नेहरू नगर, पिंपरी), अरविंद शेलार, आदनान तसेच डायमंड (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अण्णा रणदिवे (वय २६, रा. खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेली भांडण मिटविण्यासाठी आरोपी सुरज जयस्वाल याने आकाश खरात याला बोलावून घेतले. त्यावेळी आकाश याच्यासोबत फिर्यादी अक्षय रणदिवे, सागर प्रधान, घनशाम यादव, शुशांत जाधव हे देखील गेले होते. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी यांनी आकाश खरात याला कोयते, पिस्तूल सारखे हत्यार, चॉपर, फायटरने मारून वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सागर प्रधान, घनशाम यादव, शुशांत जाधव यांना कोयता व चाॅपरने वार करून जखमी केले. कोयत्याने वार करून फिर्यादी अक्षय रणदिवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने पिस्तूलसारख्या हत्यारातून फाटफाट आवाज करत कोयते, चाकू चारचाकी वाहनाच्या बाहेर काढून हवेत फिरवून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.