- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पिंपरी- चिंचवड दौऱ्याची माहिती देण्यासाठी शहर भाजपने बोलावलेल्या पत्रकार परिषदेचे कवित्व संपत नसल्याचे चित्र आहे. आयोजकांनी प्रोटोकॉल पाळला नसल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी संबंधितांना धारेवर धरले. मात्र, यानिमित्ताने आमदार जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर- भावजयीतील सुप्त राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या उमेदवारीबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्या. त्यानंतर अश्विनी जगताप यांनी स्वत: खुलासा करून वाद नसल्याचा निर्वाळा दिला होता. स्वत:ची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यानंतर प्रत्येक बैठका, कोपरा सभा, जाहीर सभा यातून त्यांनी लक्ष्मणभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्याची साद घातली. त्याला मतदारांनी प्रतिसाद देत त्यांना विजयी केले. मात्र, त्या निवडून आल्यानंतर भाजपमधील काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. आता प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या निमित्ताने या दीर- भावजयीतील सुप्त राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे कार्यकर्ते सांगतात. दीर- भावजयीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
भाजपचे वरिष्ठ लक्ष घालणार का?
उपमुख्यमंत्री होताच अजित पवार यांनी महापालिकेतील कामकाजात लक्ष घातले. भाजपच्या काळातील कामांचे लेखापरीक्षण करण्याचा इशारा दिला. भाजपचे शहराध्यक्ष जगताप, आमदार महेश लांडगे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे त्यांना पवार यांच्या कार्यशैलीची माहिती आहे. मात्र, पवार यांच्यावर ‘विशेष लक्ष’ देण्याची दखल भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून कोणी घेत नसल्याने शहरातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील पदाधिकारीही नाराज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याची घोषणा केल्याने अगोदरच धुसफूस सुरू असलेल्या शहर भाजपमध्ये नव्या कार्यकारिणीवरून नाराजीची भर पडली आहे. माजी शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या जवळच्या समर्थकांना मानाचे स्थान दिले नाही, अशी कुजबुज आहे. शंकर जगताप यांच्या नियुक्तीला विरोध करणारे अमोल थोरात यांना कार्यकारिणीत घेतले गेले नाही. यावरून भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे वाटत नाही.