पिंपरी : हापूसची आवाक वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरी व देवगड हापूसचे भाव आवाक्यात येऊ लागले आहेत. सध्या हापूसचे डझनाचे भाव ५०० ते ११०० रुपयांपर्यंत कमी आहेत. मात्र, केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी ग्राहकांना आणखी महिन्याभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याचे आकर्षण आहे. या वर्षी मार्च महिन्यातच तापमान वाढल्याने हापूसचा पहिला तोडा लवकर आला. सध्या पुणे मार्केटयार्डमध्ये साडेतीन ते चार हजार पेट्यांची आवक आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, हापूसच्या दुस-या तोड्यासाठी ग्राहकांना मे महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
बाजारपेठेतील आंब्याचे भाव-
रत्नागिरी व देवगड : एक डझनाची पेटी : ५०० ते ११०० रुपये
कर्नाटक हापूस : एक किलोचा भाव : ६० ते १०० रुपये
केशर आंबा : एक किलोचा भाव : ६० ते १२० रुपये
सध्या देवगड व रत्नागिरी हापूसची आवक चांगली आहे. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत हापूसचे भाव ग्राहकांच्या आवाक्यात राहतील. त्यानंतर आवक कमी होऊन भाववाढ होण्याची शक्यता आहे.
- शैलेश गाडगे, देवगड उत्पादक.
यंदा केशर आंब्याला डिसेंबर व फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे केशरचे उत्पादक कमी आहे. केशर बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास मे महिना उजाडणार आहे.
- हरी यादव, केशर उत्पादक.
या वर्षी रत्नागिरी व हापूस आंब्याची आवाक कमी आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात १२ हजार पेट्यांची आवक होते. ही आवाक सध्या केवळ साडेतीन ते चार हजार आहे. त्यामुळे रत्नागिरी व देवगड हापूसच्या ५ ते ८ डझनाच्या पेटीचे भाव दीड ते चार हजार रुपये आहेत.
- अरविंद मोरे, फळांचे व्यापारी