पिंपरी : तरुणाला रिक्षातून आणून मोशी कचरा डेपो समोरील ९० फुटी रस्त्यावर त्याचा खून केला. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने उलगडा केला. याप्रकरणी तीन जणांना अटक केली. रिक्षाचालकाला त्रास दिल्याने हा खून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
अमोल पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत सुधाकर कांबळे (१९, रा. गुळवे वस्ती, भोसरी), शुभम अशोक बावीस्कर (२३, रा. धावडे वस्ती, भोसरी), विजय उमेश फडतरे (२२, रा. गायकवाड वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपो समोर तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने केला. दरोडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार सागर शेडगे आणि गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित हे रिक्षातून चाकणच्या दिशेने जात आहेत. त्यानुसार दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी चाकणच्या दिशेने जात असताना लांडगेनगर भोसरी येथून संशयित रिक्षा पकडली. रिक्षातून प्रशांत कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. दोन्ही साथीदार नारायणगावच्या दिशेने गेले असल्याचे त्याने सांगितले.
सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सुमित देवकर, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कपड्यांवर रक्ताचे डाग
प्रशांत कांबळे याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी नारायणगाव गाठले. नारायणगाव बस स्थानकावर दोन तरुण संशयितरित्या थांबले होते. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तरुणाचा खून केल्याचे सांगितले.
पैसे न देता फिरायचा रिक्षातून
अमोल पवार हा मद्यपान करून रिक्षाचालकांना त्रास द्यायचा. रिक्षात बसून पैसे न देता फिरायचा. या त्रासाला कंटाळून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.