पिंपरी : कागदपत्र व मोबाइलमधील माहितीचा वापर करून विवाहिता व तिच्या मुलीच्या बँक खात्यावरील १९ लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच लग्नात स्त्रीधन म्हणून मिळालेले ८० तोळे सोन्याचे दागिने घेऊन परत न करता फसवणूक केली. त्याचप्रमाणे हनिमुनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी विवाहितेच्या पतीने व सासूने दिली. ससाणे चाळ, विठ्ठलनगर, पिंपरी येथे फेबु्रवारी २०१५ ते १० फेब्रुवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
29 वर्षीय महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रमीज कुणी मोनू (वय ३३), सासू झुबेदा कुणी मोनू (वय ५६), सासरा कुणी मोनू (वय ७१), नणंद रुतबा अब्दुल हसन टोनसे हवालदार (वय ३४), अब्दुल हसन टोनसे हवालदार (वय ३९, सर्व रा. अदिउडपी, उडपी, कर्नाटक), मावस नणंद सफिया अली (वय ४५, रा. बंगळुरू, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी यांचा आरोपी पती रमीज याने जबरदस्तीने त्यांच्या मोबाइलमधील माहिती कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या व त्यांच्या मुलीच्या बँक खात्यातून १९ लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच एका कंपनीमध्ये गुंतवूणक केलेले फिर्यादी यांच्या नावे असलेले शेअर देखील ट्रान्सफर करून घेतले. लग्नामध्ये वडिलांनी स्त्रीधन म्हणून तसेना यांना दिलेले ८० तोळे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवतो असे सांगून विश्वासाने फिर्यादी यांच्याकडून ते दागिने घेतले. पती व सासूने वळोवेळी वेगवेगळ्या कारणांवरून हाताने मारहाण करून शिवीगाळ करून छळ केला. तसेच फिर्यादी यांच्या हनिमुनचे फोटो व त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.