पिंपरी : महापालिकेच्या वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. १५ ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनामार्फत दिले होते. परंतु, आयुक्त पाटील यांची बदली होताच अधिकाऱ्यांनी गणवेशाचा आदेश धाब्यावर बसवला आहे. अनेक अधिकारी गणवेशाविनाच असून, आता ड्रेसकोडवरील नवीन आयुक्तांच्या भूमिकेची प्रतीक्षा अधिकारी करत आहेत.
गुजरात राज्यातील सुरत महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेने वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना १५ ऑगस्टपासून गणवेश बंधनकारक केला आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी व महासंघाच्या शिष्टमंडळाने सुरत दौरा केला होता. यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्याची भूमिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली. परंतु, सुरूवातीला फक्त वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना १५ ऑगस्टपासून ड्रेसकोड लागू करण्यात आला. तसा आदेश महापालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत काढला आहे.
या आदेशानुसार महापालिकेतील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना ड्रेसकोड बंधनकारक आहे. बहुतांशी अधिकाऱ्यांनी गणवेश शिवून घेतले. परंतु, आयुक्त पाटील यांची १६ ऑगस्टला बदली झाली व त्यांच्या जागी शेखर सिंह यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला असून, त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी ड्रेसकोडच्या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेत सोमवारी (दि. २२) कोणीही अधिकारी ड्रेसकोडमध्ये दिसले नाहीत. यावरून पाटील यांची बदली होताच अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे, असेच दिसते. तर नूतन आयुक्त शेखर सिंह हे ड्रेसकोडच्या निर्णयाबाबत काय भूमिका घेणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.