पिंपरी : सासरच्या १२ जणांनी जावयाला मारहाण केली. तसेच २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याला गाडीत डांबून पोलिस ठाण्यात आणले. वाकडपोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी १६ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल केला.
अनिल शंकर घोणसे (६०), सुनील शंकर घोणसे (५८), माधव पाटील (५५), भास्कर पाटील (४५), काका हिवराळे (४७), गोट्या उर्फ अश्विन पाटील (२४), एक महिला (सर्व रा. निवळी, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि इतर पाच अनोळखी लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महादेव ज्ञानोबा जाधव (३५, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. उदगीर, ता. लातूर) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी जाधव यांच्या लॅबमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यांना एका चारचाकी वाहनामध्ये डांबून मारहाण करत त्यांना वाकड पोलिस ठाण्यात आणले.
फिर्यादी जाधव यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्या प्रकरणात त्यांच्या सासरचे लोक सर्व संशयित त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यासाठी गेले. ते पोलीस ठाण्यात येत नसल्याने त्यांना बळजबरीने पोलिस ठाण्यात आणले गेले होते. जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला.