पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचा भोंगळ कारभार अवघ्या दोन आठवड्यांत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता. त्यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. आता पुन्हा एकदा पायाच्या बोटांना गंभीर दुखापत असूनही जखमेवर केवळ मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यांच्या बेपर्वाईमुळे रुग्णाला पायाची दोन बोटे गमावण्याची वेळ आली. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. अजंठानगर येथील रहिवासी अशोक रामभाऊ धेंडे (वय ५५) यांच्या डाव्या पायाच्या दोन बोटांना शनिवारी (दि.२०) रोजी अपघात झाल्याने गंभीर जखम झाली होती. त्यांच्या पायाची दोन बोटे अर्धी तुटली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी तत्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. उपचार करतेवेळी अर्ध्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया अथवा अन्य तातडीक उपचार होणे अपेक्षित होते. मात्र गांभीयार्ने दखल न घेता, डॉक्टरांनी जखमेवर केवळ तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करून रुग्णाला घरी सोडले. गंभीर स्वरूपाची दुखापत असूनही त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. गंभीर जखम असताना केवळ मलमपट्टी करून घरी गेलेल्या रुग्णाच्या बोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दुसºया दिवशीही रुग्णाच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर खासगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, वेळीच उपचार न केल्यामुळे पायाची दोनही बोटे निकामी झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तातडीने उपचार केले असते तर रुग्णाच्या पायाची बोटे गमवावी लागली नसती. यामध्ये वायसीएमच्या डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. --------------वायसीएम रुग्णालय हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. मात्र येथे गरीब रुग्णांना काहीच फायदा होत नाही. या रुग्णाला वायसीएमच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे दोन बोटे गमवावी लागली आहेत. रुग्णाचे नुकसान झाले, त्यामुळे वायसीएम प्रशासनाने त्यास भरपाई द्यावी. - राहुल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते. ------------रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखी स्वरुपामध्ये तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय. ---------------
पिंपरी वायसीएममधील भोंगळ कारभार : डॉक्टरांच्या बेफिकीरीने त्याने गमावली पायाची बोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 7:43 PM
किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता...
ठळक मुद्देतक्रारीनंतर होणार चौकशी