- बलभीम भोसले, पिंपळे गुरवपरिसरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रात्रीच्या वेळी चौकांचा श्वास गुदमरतो आहे. यामध्ये कृष्णा चौक, काटेपुरम चौक, जुनी सांगवीतील गणपती चौक, दापोडीतील आंबेडकर चौक आहेत. या चौकातील रात्रीच्या वेळी खासगी हातगाड्या व वाढत्या वाहनांमुळे परिसरातील मुख्य चौकांना जत्रेचे स्वरूप येत आहे. या मुख्य चौकात दुकानदारांची मोठ्या प्रमाणात दुकाने असल्यामुळे त्याच प्रमाणात नागरिकांचीही गर्दी असते. विविध गृहोपयोगी वस्तू व भाजीखरेदीसाठी ज्येष्ठांसह बालगोपाळांची गर्दी असते. वाहतूककोंडी झाल्यानंतर वाहनांच्या हॉर्नचा कर्क श्श आवाज ऐकावा लागतो. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रमुख रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यामुळे अनेक छोटे-मोठे चौक निर्माण झाले आहेत. परिसरांमध्ये जसजशी लोकसंख्या वाढते आहे, तसतशी वाहनांची संख्याही वाढत आहे. जुनी सांगवीतील शितोळेनगर चौकात स्पायसर कॉलेज औंध, पुणे, शितोळे मार्केट, मधुबन सोसायटी व नवी सांगवीकडून भरधाव वाहने येतात. चौक लहान व गर्दी मोठी आहे. जवळच नृसिंह हायस्कूल व अन्य प्राथमिक शाळा असल्याने लहान मुलांसह पालक वर्गाची मोठी गर्दी असते. त्यातच पालेभाज्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते. वाहतूक दिवे आहेत, मात्र ते बंद अवस्थेत आहेत. वाहतूक पोलीसही नसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच रस्ता पार करावा लागतो. कृष्णा चौकनवी सांगवीत कृष्णा चौक या मुख्य चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी निर्माण होते. या चौकात नवी सांगवीतील साई चौक, साई मिनी मार्केट व शिवनेरी चौकांतून वाहने भरधाव येतात. बहुतांश चौकांत प्रमुख रस्त्याच्या कडेला हातगाड्या व खासगी वाहने उभी करून जास्तीची वाहतूककोंडीत भर टाकण्याचे काम स्थानिक व्यावसायिक व दुकानदार करीत आहेत. या गोष्टीकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित वाहतूक विभागच्या प्रशासनाने कायमस्वरूपी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. सकाळी व रात्रीच्या वेळी भरधाव वाहनचालकांनी चौकात अचानक बे्रक लावल्यामुळे नित्यानेच छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामुळे अनेक वाहनचालकांना व पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.माझी नुकतीच सांगवी वाहतूक विभागामध्ये बदली झालेली आहे. त्यामुळे मी स्वत: या परिसरातील वाहतूक दिवे आहेत, त्या चौकांची माहिती घेऊन त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आजच १० कर्मचाऱ्यांची मागणी पोलीस उपायुक्तांकडे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. - एम. एम. पाटील,वाहतूक विभाग,पोलीस निरीक्षक, सांगवी महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण केल्या जातात. वाढती लोकसंख्या व सोईसुविधा यांचे प्रमाण बसविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. चौकामध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसवून फक्त नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. - सुरेश जाधवर, पिंपळे गुरव.रस्ते व चौक परिसरातील वाहनांची गर्दी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग व अतिक्रमण विभागाने एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. खासगी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढत असल्यामुळे गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाकडे मनुष्यबळ आहे. त्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. - माई ढोरे, माजी उपमहापौर, जुनी सांगवी. --------------------------------काटेपुरम चौकात भरधाव वाहने येतात. यामध्ये रामकृष्ण मंगल कार्यालय चौकाकडून, कृष्णा चौकाकडून, जिजामाता उद्यान चौकाकडून व मयूरनगरीकडून वाहनांची संख्या जास्त आहे. या भागात ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते असूनही वाहनांच्या अवास्तव पार्किंगमुळे वावरण्यास रस्ते अपुरे पडत आहेत.खासगी दुकानदारांनी दुकानांपुढे पत्राशेड उभे करून आपले बस्तान मांडले आहे. काही दुकानदार दुकानातील वस्तू पदपथावर आणून मांडतात. रस्त्याच्या अर्ध्या भागाचा वापर रहदारीसाठी न होता. पथारी, फळविके्रते, भाजीविके्रते, कपडेविके्रते, अंडीविके्रते व बेशिस्त पार्किंगसाठी जास्त प्रमाणात वापर होत आहे. दापोडीतील आंबेडकर चौकांमध्ये शितळादेवी चौक, यांत्रिकी भवन व गावठाणातून, तसेच भाजी मंडई रेल्वे गेटकडून भरधाव वाहने येतात. या परिसरातील मुळातच रस्ते अपुरे आहेत. यामध्ये खासगी व्यावसायिकांची जास्तीची भर पडते आहे. गणेश गार्डन येथे रेल्वेचा उड्डाणपूल बनविल्यामुळे बहुतांश वाहने ही या आंबेडकर चौकांतूनच जातात.
प्रमुख चौकांचा श्वास गुदमरतोय!
By admin | Published: August 23, 2015 4:19 AM