वडगाव मावळ : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर अनेक विपरीत परिणाम होताना मावळ तालुक्यात दिसत आहे. वातावरणात होत असलेल्या सलग बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून, सरकारी व खासगी दवाखान्यात नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक उष्णता जाणवत असून, मावळमध्ये उकाड्याने भर पावसात नागरिक हैराण झाले आहेत. यातच वडगाव येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाची झोप उडाली असून, आरोग्य विभागाने आरोग्य सेवेसाठी कंबर कसली आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित वाढोकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या महिलेला सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आल्याने त्यांना शुक्रवारी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यात स्वाइन फ्लूचे (एच १एन१) विषाणूची लागण झाल्याने त्यांना फुप्फुसाचा न्युमोनिया झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या.तापाच्या रुग्णांमध्ये वाढआरोग्य केंद्रावर टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध केल्या आहेत. स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू सर्व ऋतूंत जिवंत राहत असून, हवेतून या आजाराच्या विषाणूची लागण होते. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, दम लागणे, तीव्र श्वसनदाह आदी लक्षणे असून, नागरिक व रुग्णांनी घाबरून न जाता, त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपसणी करून घ्यावी. रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल बांधावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. संशयित रुग्णाच्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था (पुणे) येथे करून अहवाल मिळतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. चंद्रकांत लोहार यांनी केले आहे.आरोग्य विभागाच्या वतीने मावळातील तळेगाव दाभाडे, खडकाळा, येळसे, कार्ला, टाकवे बुद्रुक व आढले बुद्रुक या प्राथमिक आरोग्य केंद्रासह ३६ उपकेंद्रावर स्वाइन फ्लू आजाराची तपासणी सुरू केली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांकडून स्वाइन फ्लू लक्षण असलेल्या रुग्णाचे सर्वेक्षण सुरू आहे.- डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका आरोग्याधिकारी
आरोग्य आले धोक्यात, वातावरणातील बदल, स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 3:18 AM