पिंपरी : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर पावसाने शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. सकाळपासून शहरातील सर्वच भागात पावसाने रिपरीप सुरु केली आहे. आठ वाजेपर्यंत ८१ मीमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवडेनगर येथील श्रीराम कॉलनी परीसरात घरात पाणी घुसले.
अवघ्या तीन तासात झालेल्या पावसामुळे चिंचवड परिसरातील चिंचवडेनगर येथील श्रीराम कॉलनीत पावसाचे पाणी घरात घुसल्याची वर्दी निगडी प्राधिकरण अग्निशमन दलाला आली होती. मात्र हे पाणी हळूहळू ओसरले.
पहाटे सुरु झालेला पावसाचा जोर सकाळी आठ पासून उतरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दाटलेल्या ढगांमुळे अद्यापही काही भागात सुर्यदर्शन झालेले नाही. मागील दोन दिवसाच्या उकाड्याची जागा आता गारवा व पावसाने घेतली आहे.
घरकुलमधील इमारतींत पाणीच पाणी
चिखलीच्या घरकूल नवनगर संकुलातील २४ इमारतीमध्ये पाणी घुसल्याने येथे राहण्यास असलेल्या जवळपास तीन हजार नागरीकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली तर अचानक आलेल्या पावसाने विद्यार्थ्यांनाही दांडी मारावी लागली.