हिंजवडी (पुणे) : आयटी पार्कमधील फेज तीनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने, जणू काही रस्त्यावर नदी अवतरल्याचा प्रत्यय आयटीयंससह स्थानिक नागरिकांना येत आहे. आयटीपार्क फेज दोन ते फेज तीन दरम्यान रस्त्यावर सुमारे चार फूट खोल आणि शंभर मीटर लांब एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहन चालकांना यातून वाट काढताना तारे वरची कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने, दुचाकीस्वरांच्या कमरे इतके पाणी लागत असल्याने पाण्याचा आणि खड्डयांचा अंदाज घेऊन त्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे.
दरम्यान, मागील पाच सहा दिवसांपासून आयटीनगरी परिसरात धुव्वादार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे, आयटी पार्ककडे येणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
येथील, अनेक रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाकडे आहे. मात्र, आयटीपार्क मधील अत्यंत वर्दळीच्या अशा फेज तीन कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एवढ्या मोठया प्रमाणावर पाणी साचून रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप येत असेल तर, एमआयडीसी प्रशासन नक्की करतेय तरी काय असा संतप्त सवाल आयटीयंससह स्थानिक नागरिक उपस्थितीत करत आहे.