पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडीच्या घटना घडल्या. तर मोशीत होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यामुळे जीवित हानी झाली नसली तरी आर्थिक हानी झाली आहे. गुरुवारी झालेल्या वळवाच्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत शहरात सात मिलीमीटर (मिमी) पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने दोनच दिवसांपूर्वी पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी पावसाने हजेरी लावली नाही. मात्र गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. शहरात गुरुवारी दुपार पासूनच ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाडा मात्र कायम होता. गुरुवारी किमान २३.३ तर कमाल ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील मोशी, नाशिक फाटा, नेहरु नगर, हिंजवडी परिसरात दुपारी तीन नंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला होता.
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. सायंकाळी चार नंतर मात्र शहरातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली. किवळे, रावेत, मोशी, हिंजवडी परिसरात मुसळधार पाऊस पडला. तर खराळवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी परिसरात रिमझिम पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसाचा वाहतूकीवर देखील परिणाम झाला होता. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु होती.
तळेगावात शेती पिकांचे नुकसानतळेगाव शहर परिसरात साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे आंबा पिकासह उन्हाळी बाजरी व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच वीट उत्पादक शेतकऱ्याच्या कच्च्या विटा भिजल्या आहेत. यामुळे वीटभट्टी कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. तळेगाव परिसरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत १५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.