पिंपरी: सप्टेंबरची सुरुवात ऑक्टोबर हिटने होत आहे. महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण परिसरामध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. उशिरा पावसाने सुरुवात होऊन पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २७ ऑगस्टला भरले.
त्यानंतर पावसाने ओढ दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. शुक्रवारी कमाल तापमान हे २६ अंश सेल्सिअस वर पोहोचले होते. दिवसभर आणि रात्री कमालीचा उकाडा जाणून आला. पिंपरी चिंचवड शहरात साडेचार सुमारास पावसाला सुरुवात झाली. सकाळी साडेसहा पर्यंत पाऊस कोसळत होता. अधून- मधून ढगांचा गडगडात होत असला तरी, शांतपणे पाऊस कोसळत होता.
अचानक आलेल्या पावसाने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. शहर परिसरातील किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, तानाजीनगर, केशवनगर, काळेवाडी, वाकड, पिंपरी, भोसरी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सकाळी वॉकिंगला जाणाऱ्या नागरिकांची झाली.