पिंपरी: पिंपरी चिंचवड सह मावळ मुळशी परिसरामध्ये गेल्या २४ तासांमध्ये जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तर पवना नदीकाठच्या चिंचवड केशवनगर भागामध्ये नागरी वसाहतीमध्ये पाणी सोडले आहे. लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सलगपणे पिंपरी -चिंचवड आणि मावळ, मुळशी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील शासकीय खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. केशवनगर चिंचवड परिसरातील पोतदार स्कूलच्या परिसरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तसेच चिखली घरकुल परिसरामध्ये काही भागांमध्ये पाणी घुसले आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
कामगारांची झाली गैरसोय
संततधार पाऊस सुरू असल्याने सकाळी पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या आणि शेवटच्या शिफ्ट वरून येणाऱ्या कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली. घरकुल बिल्डींग न.सी ३३ सोसायटी समोरील परिसरातील गंभिर परिस्थिती. रस्त्याला मोठया जलाशयाचे स्वरुप तयार झाले आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७० टकके क्षमतेने भरले असून आज दू. २:०० वा धरणाच्या सांडव्यावरून २५०० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात ,पाऊस चालू, वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवर धरणाचे अधिकारी बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.
२४ तासात झालेला पाऊस(मिलिमीटरमध्ये)
लवासा : 453लोणावळा: 370.5निमगिरी: 232.5चिंचवड: 175.0तळेगाव दाभाडे : 167.5लवळे: 166.5वडगाव शेरी: 140.5पाषाण: 117.2शिवाजीनगर: 114.1दापोडी: 102.0खेड: 93.0हवेली : 82.0बारामती : 20.4