पवनानगर : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अशात आज शुक्रवारी (दि. ८ सप्टेंबर) पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता एकुण ३५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पवना नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी सावध रहावे, अशी सूचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता वीज निर्मिती गृहद्वारे पवना नदीमध्ये सकाळी ६ वाजता १४०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता आणि आवकानुसार सकाळी ८ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून २१०० क्यूसेक्स असे एकुण ३५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. त्याच बरोबर पावसाचा जोर वाढला असल्याने दुपारी दोननंतर एकूण ५६०० ने विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.