किवळे : मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपुलाचे काम दहा महिन्यांपूर्वी सुरू झाले असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही या रस्त्यावरून जड, अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.या रस्त्यावरून जड वाहतूक होत असल्याने अरुंद महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच विविध कामे सुरू असल्याने जड वाहनांमुळे ऐन दिवाळीच्या गर्दीत देहूरोड परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अनेकदा वाहतूककोंडीला निमंत्रण मिळत आहे.निगडी ते देहूरोड दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. ही वाहतूक कात्रज बाह्यवळण मार्ग, भूमकर चौक, वाकडमार्गे बिर्ला हॉस्पिटल, स्पाईन रोडमार्गे भक्ती-शक्ती चौकाकडून वळविण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राजेश मुठे यांनी दिले आहेत. मात्र, या रस्त्यावरून जड, तसेच अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने सर्रास ये-जा करीत आहेत. पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यास जड वाहतूक बंद होऊ शकते, असे मत ते व्यक्त करीत आहेत.फलकाकडे होतेय वाहनचालकांचे दुर्लक्षरस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराने देहूरोड व निगडी येथे मुख्य रस्त्यावर अडथळे उभारून जड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे फलकही लावले आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी कंत्राटदाराने कामावर लावलेले कामगार वाहनांना रोखण्यात अपयशी ठरत असून, अनेकदा वाहने गेली, तरी त्यांचे त्याकडे लक्ष नसते. त्यामुळे वाहने बंदी असलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना दिसत आहेत. स्थानिक नागरिक जड वाहतूक सुरू असल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत.
बंदी असूनही महामार्गावर जड वाहनांची वाहतूक, निगडी-देहूरोड : अरुंद रस्त्यावर अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:01 AM