पिंपरी : हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, तुमच्या काॅलेजात आमचे एक ॲडमिशन करून द्या, असे सांगत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने चिंचवड येथील एकाला अटक केली.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून याप्रकरणी २१ मे २०२३ रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. राहुल राजेंद्र पालांडे (वय ३१, रा. चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पालांडे यांच्या फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो आहेत. पालांडे याने त्याच्या फोन नंबरला ‘ट्रू कॉलर’वर सीएमओ ऑफिस महाराष्ट्र शासन मुंबई असे स्वतः सेव्ह केले होते. त्यामुळे त्याने कोणालाही फोन केल्यास ‘ट्रू कॉलर’वर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, असे वाटत असे. त्याच बरोबर पलांडे याने व्हॉट्स ॲप डीपीवर शासनाचे बोध चिन्ह ठेवले होते. या सगळ्या गोष्टींमुळे तो सरकारी अधिकारी तसेच लोकसेवक असल्याचे भासावित होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
पालांडे याने हा सगळा उद्योग शहरातील तसेच बंगळूरमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पैसे घेऊन ॲडमिशन मिळवून देण्यासाठी केला. पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिंबायोसिस आणि डाॅ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार ॲडमिशन मिळवून देण्यासाठी पालांडे हा मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवित होता.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य काही मंत्री एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी देखील होते. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बहुसंख्य कॉलेजचे संस्थापक, चालक देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पालांडे याने केलेल्या फोनवरील विनंतीवरून काॅलेजला ॲडमिशन दिल्याचे शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनातील काही जणांनी सांगितले. मात्र, मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने कधीही कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले. पालांडे याने बनावट नावाचा वापर करून, लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पालांडे याला अटक केली. न्यायालयाने पलांडे याची २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.