- नारायण बडगुजर
पिंपरी : भरदिवसा डोक्यात दगड घालून तरुणाचा खून झाला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली. मात्र, कोणीही बोलायला तयार नव्हते. सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यातही मारेकरी ओळखून येत नव्हते. एका दुचाकीबाबत माहिती मिळाली. त्यावरून दुचाकी मालकाचा शोध घेतला. मात्र, त्यानेही खून केला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. अखेर मारेकऱ्यांचा शोध लागला. खून करणारे संशयित अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले.
चिखली येथील जाधववाडीत ३५ वर्षीय तरुण ३१ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी कामावरून घरी येत होता. जाधववाडी येथे दोन अल्पवयीन मुलांच्या दुचाकीचा त्याला धक्का लागला. त्यामुळे त्याने एका अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने मुलांनी तरुणाला मारहाण केली. त्यामुळे तो बचावासाठी पळत जाऊन दुकानात घुसला. अल्पवयीन मुलांनी पाठलाग करून त्याला दुकानातून बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा मृत्यू झाला.
खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी चिखलीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी पथकाला सूचना केली. त्यानुसार पथकाने प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी सुरू केली. मात्र, भीतीपोटी कोणीही घटनेबाबत किंवा खून करणाऱ्यांबाबत माहिती देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी दोन मुले तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसून आले. मात्र, फुटेज अस्पष्ट असल्याने मारेकऱ्यांची ओळख पटत नव्हती.
दरम्यान, मारेकऱ्यांनी वापरलेल्या दुचाकीबाबत माहिती मिळाली. दुचाकीचा क्रमांक मिळवण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. क्रमांक मिळवून त्यावरून दुचाकी मालकाचा शोध घेतला. त्याच्याकडे कसून चौकशी केली. मात्र, काहीही निष्पन्न झाले नाही. विविध प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी केली. दुचाकी आपला मुलगा वापरतो, असे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुलाकडे चौकशी केली. मुलाने त्याच्या मित्रांना दुचाकी दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी १७ व १४ वर्षीय, अशा दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
खून करून दुचाकी परत केली
चिखलीत मित्राकडे जायचे आहे, असे सांगून दोन्ही अल्पवयीन मुलांनी मित्राकडे दुचाकी मागितली होती. दरम्यान, दुचाकीवरून जाताना ३५ वर्षीय तरुणाला धक्का लागला. त्यात झालेल्या वादातून तरुणाचा खून केला. त्यानंतर दुचाकी परत करून दोन्ही अल्पवयीन मुले काहीही घडले नसल्याच्या आविर्भावात निघून गेली होती.
सीसीटीव्ही फुटेजवरूनही तरुणाच्या मारेकऱ्यांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या वाहनाची माहिती घेतली. त्यावेळी खबऱ्यांचे ‘नेटवर्क’ कामाला आले. दुचाकी कोणत्या रंगाची होती, तिचा क्रमांक यावरून मालकाचा शोध घेतला. त्यानंतर मारेकरी अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचता आले.
-वसंत बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक