पिंपरी : गणेशोत्सव काळात उघडीप दिलेल्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक १२७. ५ मिमी पावसाची नोंद चिंचवडमध्ये झाली आहे. तर सर्वाधिक कमी दापोडीत ८. ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गणेशोत्सव काळात पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसापासून उकाडा वाढला होता. दिवसा ऊन, रात्री उकाडा आणि पहाटे गारवा असा संमिश्र वातावरणाचा अनुभव येत होता. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट जाणवू लागली होती. मात्र, शनिवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. सुरुवातीला हलक्या सरी येत होत्या. रविवारी आणि सोमवारी जोर कमी होता. मंगळवारी पावसाचा जोर वाढला. आज बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सकाळच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिली. कडक ऊन पडले होते. दुपारी दीडपासून शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. सायंकाळी साडेचारनंतर पावसाचा वेग वाढला. अचानक आलेल्या पावसाने कामावर गेलेल्या आणि कामावरून परतणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाची गैरसोय झाली. तारांबळ उडाली.
सखल भागात साचले पाणी!
चिंचवड आणि पिंपरी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. तसेच पावसाळी गटारे काही ठिकाणी तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत १२७. ५ मिमी पावसाची नोंद चिंचवड येथे झाली.
असा झाला पाऊस!
चिंचवड : १२७ मिमी शिवाजीनगर :१२४ मिमीखेड : ४१ मिमी लोणावळा : २६ मिमी राजगुरूनगर : २२ मिमी हवेली : १२. ५ मिमी लोहगाव : ३० मिमीमगरपट्टा: १० मिमी पाषाण : १९.८ मिमीदापोडी : ८. ५ मिमी