वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे तिकीट वाटप झाल्यानंतर मावळात प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी व्हॉट्स अॅप, क्लिप, व्हॉट्स अॅप संदेश, चित्रफिती यांचा वापर करत आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. निवडणुकीच्या काळात त्याचा वापर करण्यात उमेदवारही यात मागे नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने मतदारांच्या घरोघरी जाण्यासोबतच सोशल मीडियाचाही मावळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरात वापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. उमेदवारांनी तर गट आणि गणनिहाय व्हॉट्स अॅप ग्रुपसुद्धा तयार केले आहेत. यात प्रत्येक पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पदयात्रा, जाहीर सभा, छोट्या सभा असे एक ना अनेक उपाय करावे लागतात. या निवडणुकीतही उमेदवार त्याचा वापर करीत आहेतच. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधणे अधिक सोपे झाले आहे. उमेदवारांनी आपापल्या गट आणि गणानुसार व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर जास्तीत जास्त नागरिकांना जोडले जात आहे. सकाळी निघालेल्या पदयात्रांचे फोटो तत्पर या ग्रुपवर सेंड करून ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत. नागरिकांशी प्रत्यक्ष घरी जाऊन संवाद साधणे सुरूच आहे. परंतु जी मंडळी कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्यापर्यंत सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येकाच्याच मोबाइलवर अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नावाने नवनवीन ग्रुप असल्याचे दिसत आहे. आपण या ग्रुपमध्ये कसे काय जोडले गेलो हे नागरिकांनादेखील कळेनासे झाले आहे. उमेदवारांचा हा डिजिटल प्रचार फंडा सध्या शहरात व ग्रामीण भागात चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.प्रचारपत्रके आणि कार्य अहवाल यांच्या वाटपाबरोबरच उमेदवारांकडून डिजिटल प्रचारालाही पसंती दिली जात आहे. निवडणुकीला आठ-नऊ दिवसांचा अवधी राहिल्यामुळे व्हॉट्स अॅप क्लिप, व्हॉट्स अॅप संदेश, चित्रफिती आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, या सेवा पुरवणाऱ्यांच्या व्यवसायामध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल प्रचार साहित्याच्या मागणीमध्ये ग्रामीण भागातील उमेदवाराकडून देखील वाढ झाली आहे.(वार्ताहर)
मावळात हायटेक प्रचार
By admin | Published: February 13, 2017 1:54 AM