पिंपरी : आयटी पार्कमधील वाहतूक तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय आणि सहाकार्य आवश्यक आहे. त्यासाठी एचआयए, पीएमआरडीए, महापालिका आणि एमआयडीसी व पोलीस खाते यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले.
हिंजवडी - माण आयटी पार्कमधील विविध समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी येथे सोमवारी बैठक झाली. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, विविध आय.टी कंपन्यांचे प्रतिनिधी, पीएमआरडीए, पीडब्लूडी आणि एमआयडीसीचे अधिकारी तसेच हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
आयटी पार्कमधील विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्षा कर्नल(निवृत्त) भोगल यांनी आयटी पार्कमधील विवध प्रश्न मांडले. तसेच त्याबाबत प्रेझेंटेशन केले. वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीची समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी सादरीकरण केले. अधिराज गाडगीळ यांनी सादरीकरण केले.
पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले, आयटी पार्कमधील वाहतुकीशी संबंधित समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांकडून इतर विभागाशी संपर्क साधून सहकार्य घेतले जाईल. तसेच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.