हिंजवडी : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करण्यात हिंजवडी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह होता. काही दिवसांपूर्वी गळ्यात गळे घालून ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे कार्यकर्ते या निवडणुकीमुळे एकमेकांसमोर ठाकले होते. यामुळे रंगत निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीप्रमाणेच या निवडणुकीतही कार्यकर्ते जोरदार काम करीत होते. मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम हे कार्यकर्ते करत असल्याने मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे अधिकारी वर्गदेखील चकित झाला होता. सकाळी सातपासूनच मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. अनेक कार्यकर्त्यांकडे जुनी मतदारयादी असल्याने अधिक गोंधळ निर्माण होत होता. यातच पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा दोघांना मत देणे बंधनकारक असल्यानेही बाब अनेकांच्या लक्षात येत नव्हती. यामुळेदेखील मतदार गोंधळलेला, तर अधिकारी चिंतेत असल्याचे दिसत होते. (वार्ताहर)हिंजवडीत एक मशिन बंद, तर एकात बिघाड हिंजवडीमध्ये मतदान केंद्र ३४ मध्ये दुपारी तीनला मतदान केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याची बाब लक्षात आली. यात घड्याळासमोरील बटण दाबल्यास धनुष्यबाणासमोरील लाईट लागत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे मतदानयंत्र दुसरे बसवण्यात आले. तर ३६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मशिन दुपारी चारला बंद पडल्याने तेथेही काही प्रमाणात गोंधळ असल्याचे चित्र होते. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही मतदार घरी निघून गेले.
हिंजवडीत मतदारांचा उत्साह
By admin | Published: February 22, 2017 2:38 AM