लोणावळा - विसापूर किल्ल्यावर दीपोत्सवानंतर विकास मंचाचे कार्यकर्ते भटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारूगोळा कोठाराजवळील भूपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला.पाहणी केली असता ८ ते १० किलो वजनाचे आणखी दोन लोखंडी तोफगोळे सापडले. तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारात मोडतात. या तोफगोळ्यांमध्ये दारू भरून नंतर वातीद्वारे उडविले जात असत, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे तज्ज्ञ इतिहास संशोधक सचिन जोशीयांनी दिली. तोफगोळे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हेमंत वाघमारे व सुभाष दहिभाते यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड-विसापूर विकास मंचाच्या वतीने गेली अठरा वर्षे मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य केले जाते. दर वर्षीप्रमाणे दिवाळीमध्ये मंचाच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भटकंती करताना तोफगोळे आढळल्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साक्षात दुर्गलक्ष्मी अवतरल्याचा साक्षात्कार झाला. या प्रसंगी संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, वैभव गरवड, अमोल गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.विकास मंचाच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्त्व विभागाने नुकताच शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. पावसाळ्यात दक्षिणेकडील तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तूंचीदेखील दुरवस्था झाली आहे.
मावळात विसापूर किल्ल्यावर आढळले ऐतिहासिक तोफगोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 1:53 AM