पिंपरी : ओव्हरटेक करू न दिल्याने एका चारचाकी चालकाने एसटी बसच्या चालकास मारहाण केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १२) ही घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी भोसरीपोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. अभिजित रमाकांत बोराटे (रा. बोराटेवस्ती, तबाजीनगर, देहू रस्ता, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नारायणगाव डेपोचे बसचालक सिध्देश्वर मधुकर आघाव (वय ३४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिध्देश्वर आघाव खिरेश्वर ते नारायणगाव ही एसटी बस (एमएच.१४. बीटी. ६२३) घेऊन नाशिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी भोसरी येथे टी पॉईंटवर एक राखाडी रंगाची चारचाकी स्विफ्ट (एमएच. १२. पीएच.४६९४) बसच्या समोर थांबली. बसचा रस्ता अडवून चारचाकीचा चालक अभिजित बोराटे याने बसचालक सिध्देश्वर आघाव यांना शिवीगाळ केली. तू तुझी गाडी का थांबविली नाही, मला पुढे जायचे होते, असे म्हणून बोराटे याने आघाव यांना मारहाण केली. त्यांचे जर्किन फाडून तसेच त्यांचे खाकी शर्ट ओढून दोन बटणे तोडून जखमी केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत......................
‘ओव्हरटेक’ करू न दिल्याने एसटी बस चालकास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:56 PM