रावेत : वाल्हेकरवाडी येथे पेठ क्रमांक ३० मध्ये प्राधिकरण गृहप्रकल्प विकसित करीत आहे. सात एकर जागेवर हा प्रकल्प सुरू आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी किफायतशीर दरात हे फ्लॅट बांधण्यात येत आहेत. हे फ्लॅट वन आणि टू बीएचके असणार आहेत. सुमारे ५०० फ्लॅट या प्रकल्पात तयार करण्यात येणार आहेत. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यामध्ये वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सध्या ७९२ सदनिकांच्या गृहयोजनेचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, प्रशासनाने ठेकेदाराला दंडाची नोटीस दिल्यानंतर काम सुरू झाले आहे.
प्राधिकरणाचा संपूर्ण गृहप्रकल्प कोरियन तंत्रज्ञानावर आधारित असून, बांधकामाचे बहुतांश साहित्य कोरियामधून आयात केले आहे. त्यामुळे बांधकामाचा मजबूतपणा चांगल्या दर्जाचा आहे. सदनिकांचे वितरण सोडत पद्धतीने करण्यात येणार असून, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या सदनिका लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या ठरणार आहेत. सदनिकांचे काम येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता असली, तरी काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण वाल्हेकरवाडीत गृहप्रकल्प उभारत आहे. अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या प्रकल्पाला गेल्या वर्षी सुरुवात झाली खरी; परंतु अद्यापही हा गृहप्रकल्प केवळ प्राथमिक अवस्थेतच आहे. प्रकल्पास अगोदरच उशीर झाला आणि यात भर म्हणजे भूमिपूजनप्रसंगी झालेल्या वादामुळे चर्चेत आला. वर्षभरापासून बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असून, हा प्रकल्प रखडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची १९७२ मध्ये स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापना झाली. परंतु सध्या प्राधिकरण मूळ उद्देशापासूनच दूर जात असल्याचे दिसते. कारण मागील वीस वर्षांमध्ये प्राधिकरणाकडून एकही गृहप्रकल्प पूर्ण झालेला नाही. प्राधिकरण बांधकाम व्यावसायिकांच्या हातात हात घालून काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सुरू असलेला गृहप्रकल्प एक वर्षानंतर केवळ दोन ते तीन मजल्याच्या बांधकामापर्यंतच गेला आहे. संथगतीने काम सुरू असल्यामुळे ठेकेदाराला दंडही ठोठावला होता; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. हा गृहप्रकल्प किमान एक ते दीड वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.सदाशिव खाडे : मुदतीत काम पूर्ण करणारप्राधिकरण कार्यालयाने वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पाची निविदा केव्हा काढली आणि कामाची ठेकेदाराला कधीपर्यंतची मुदत दिली आहे, याबाबत माहिती घेत असून, काम वेळेत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराशी चर्चा करून त्यांना आदेश दिले आहेत. ठेकेदाराकडून कामामध्ये दिरंगाई दिसून आल्यास त्याला प्रति दिवस दहा हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.- सदाशिव खाडे, अध्यक्ष, नवनगर विकास प्राधिकरणवाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्प परदेशी तंत्रज्ञानावर उभा करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक असणारे भाग आयात केले आहेत. सध्या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. वरील मजले बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प जूनपर्यंत पूर्ण होईल. सध्या १२ इमारती व ६ विंग पूर्ण झाल्या आहेत. सोडत पद्धतीने ही घरे दिली जाणार आहेत. सोडत पद्धतीचे अद्याप नियोजन करण्यात आले नाही. आदेश प्राप्त होताच सोडत पद्धत काढली जाईल.- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, नवनगर विकास प्राधिकरण