कामशेत : अंगणवाडीत शिकणा-या चिमुरड्याचा जीव वाचविणा-या आंदर मावळातील अनसुटे येथील अंगणवाडी सेविका हिराबाई किसन लष्करी व शोभा गबाजी गायकवाड यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती राणी शेळके आदी उपस्थित होते.अनसुटेतील सार्थक चिंतामण मोरमारे या चिमुरड्याच्या जेवणाच्या डब्यात एका इसमाने विषारी औषध टाकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. वर्गात औषधाचा उग्र वास आल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाणवले. त्यांनी वर्गातील मुलांनी डबे खाऊ नये, अशी सूचना देऊन सुरुवातीला हा वास गॅस सिलिंडरचा आहे का याची पाहणी केली़ त्यानंतर मुलांचे डबे तातडीने पाहिले असता सार्थकच्या डब्यातील मसालेभात काळा पडला होता. त्यांनी वास घेतला असता हे विषारी औषध असल्याचे जाणवले. ही बाब गावक-यांच्या निदर्शनास आणून देऊन संबंधित इसमावर फौजदारीदेखील दाखल करण्यात आली. त्यामुळे चिमुरड्याचा जीव वाचविणा-या सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, या वेळी इंदोरीतील रंजना संभाजी शिंदे यांना आदर्श अंगणवाडी सेविका व काले कॉलनीतील माधुरी महेंद्र जव्हेरी यांना आदर्श मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने लष्करी व गायकवाड यांचा अतिष परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले, सचिव वाडेकर संचालक तानाजी असवले, स्वामी जगताप, जुलेखा शेख, अलका म्हेत्रे आदी उपस्थितीत होते.समाज कल्याणचे माजी सभापती अतिष परदेशी म्हणाले, अंगणवाडी सेविकेच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली़ अंगणवाडी सेविका शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवित आहे़ तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाजी असवले यांनी प्रास्ताविक यांनी केले. प्रतिभा लंके यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी असवले यांनी आभार मानले. हिराबाई लष्करी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चिमुरड्याचा जीव वाचविणा-यांचा सन्मान, अंगणवाडी सेविकांचे होतेय कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:25 AM