लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध झोपडपट्ट्यांच्या भागात उघड्यावर शौचास जाणे थांबविण्यासाठी बोर्डाच्या वतीने तातडीने फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. इतर कॅन्टोन्मेंटपेक्षा देहूरोड कॅन्टोन्मेंट काहीसे मागे असून आणखी मोठा टप्पा गाठावयाचा आहे. अतिरिक्त शिक्षकांना पुणे व खडकी येथे पाठविण्याबाबत बोर्डाने निर्णय लवकर घेणे गरजेचे असल्याचे मत दिल्ली येथील रक्षा संपदा संचालनालयाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी येथे व्यक्त केले. महासंचालक शर्मा यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंटला भेट दिली. त्या वेळी बोर्ड कार्यालयातील बैठकीत शर्मा बोलत होते. दक्षिण विभागाचे संचालक राजेंद्र पवार, भास्कर रेड्डी, केजेएस चौहान, संजीवकुमार, खडकी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, अधीक्षक श्रीरंग सावंत उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी बोर्डाच्या विविध विकासकामांची व इतर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. उपाध्यक्षा पिंजण, सदस्य शेलार, खंडेलवाल व मारीमुत्तू यांनी लष्करी विभागाकडून येणााऱ्या समस्या विशद केल्या. रक्षा संपदा विभागाकडील जागांचे वर्गीकरण लवकर करण्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली. बोर्डाकडून ठोस निर्णय घेतले जात असल्याचे गेल्या काही दिवसातील ठरावांवरून दिसून येत असल्याचे शर्मा यांनी निदर्शनास आणले. बोर्डाच्या वृक्षारोपण व रुग्णालयाबाबत समाधान व्यक्त केले. महासंचालक शर्मा म्हणाले, विभागनिहाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) राबविण्याची गरज आहे. २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प तयार करण्यात आला असला तरी, तूर्त गरज असलेल्या भागात उपलब्ध पाणी पोहचविणेबाबत पावले उचलावीत. अतिरिक्त शिक्षकांबाबत निर्णय घ्यावा.
झोपडपट्टी ‘निर्मल’ होण्याची आशा
By admin | Published: June 30, 2017 3:41 AM