वडगाव मावळ : निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या २४ तासांपासून वडगाव, कामशेत, परिसरातील दोनशेगावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.वादळामुळे वडगाव परिसरात ठिकठिकाणी झाडे पडली. तसेच महामार्गालगत हॉटेलवर मुख्य विद्युत वाहिनीवर जाहिरात फलक कोसळला. त्यामुळे वडगाव, कामशेत व परिसरातील सर्व गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे. वडगाव शहर परिसरात जीर्ण झालेला एक जाहीरात फलक चार दिवसापूर्वी पडला होता.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परिसरातली बेकायदेशीर फलक काढावे अशी मागणी मनसेने केली होती. वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे म्हणाले, शहर परिसरात अनेक लोखंडी फलक जीर्ण झाले आहे. काल कोसळलेल्या फलकामुळे वडगाव, कामशेत व परिसरातील सर्व गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.अनेक गावच्या पाणी योजना बंद आहेत. परिसरात फलक लावण्याची काही जणांना परवानगी एमएसआरडीने दिली आहे. मुळात विद्युत वाहिनीजवळ परवानगी दिलीच नाही पाहिजे. अनेक ठिकाणी हे लोखंडी फलकाचे खांब कुजले आहेत. याची तपासणी देखील एमएसआरडीने केली नाही. वडगाव परिसरातील सर्व फलक तातडीने काढावे अशी मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केली आहे. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार एमएसआरडी राहिल.
वडगावमावळ येथे चक्रीवादळामुळे विद्युत वाहिनीवर जाहिरात फलक कोसळला; २०० गावातला वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:53 PM