पिंपरी : भोसरी इंद्रायणीनगर येथील शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गतच्या वसतिगृहातून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना घडली आहे. तरुणाने तिला फूस लावून कोल्हापूरला पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, आरोपीविरोधात भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसतिगृहातील मुले, मुली यांच्या सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली जात नसल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी, इंद्रायणीनगर येथील वसतिगृहात ठेवलेल्या १६ वर्षाच्या मुलीला २३ वर्षाच्या तरुणाने कोल्हापूरला पळवून नेले आहे. तुकाराम सावळेराम उघडे असे मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. फूस लावून पळवून नेलेल्या मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भोजन, चहा, नाष्टयाच्या निमित्ताने विद्यार्थी वारंवार वसतिगृहाबाहेर जातात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही.वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसºया मजल्यावरून तोल जाऊन अमित गणपत वळवी हा २५ वर्ष वयाचा तरुण खाली पडल्याची घटना १५ दिवसांपूर्वी याच वसतिगृहात घडली. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मणक्यावरील शस्त्रक्रियेनंतर उपचार करून दोन दिवसांपूर्वीच अमितला रुग्णालयातून सोडले आहे. पाठीच्या मणक्याला दुखापत झालेला अमित रुग्णालयातून बाहेर आला. वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याची ही घटना ताजी असतानाच वसतिगृहातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.