पिंपरी : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ‘ड्राय डे’ घोषित केलेला असतानाही दारुविक्री करणाऱ्या हाॅटेलवर पोलिसांनी छापा टाकला. रोकड, मोबाईल फोन तसेच दारुच्या बाटल्या, असा ४० हजार ९३१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच हाॅटेलमालकाला अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण येथे सोमवारी (दि. ३०) ही कारवाई केली.
नीलेश बाळासाहेब पानसरे (रा. चाकण), असे अटक केलेल्या हाॅटेलमालकाचे नाव आहे. चाकण येथे शिक्रापरू रोडवर आरोपी याचे सार्ई मुद्रा व्हेज नॉनव्हेज नावाचे हॉटेल आहे. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ‘ड्राय डे’ घोषित केला असे असतानाही आरोपी पानसरे हा त्याच्या हाॅटेलमध्ये अवैधरित्या दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून दारूची विक्री होत असल्याची खात्री केली. त्यानंतर छापा टाकून १७ हजार ११० रुपयांची रोकड, सात हाजर रुपये किमतीचा एक मोबाईल, १८ हजार ८२१ रुपये किमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या देशी-विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बाटल्या, असा एकूण ४० हजार ९3१ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, अनिल महाजन, अमोल शिंदे, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.