पिंपरी - शिक्षण जगवेल आणि छंद कसे जगायचे ते शिकवेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध्र अभिनेते उपेंद्र लिमये यांनी केले.चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे पे्रक्षागृहामध्ये फेअर फेस्टोचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाºया युवक-युवतींच्या प्रश्नांना उत्तर देताना लिमये बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, उद्योजक शैलेश शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, ब्रिगेडीअर अजय लाल, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, डॉ. क्षितिजा गांधी, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. सुवर्णा गोगटे आदी उपस्थित होते. लिमये यांच्या हस्ते कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्यांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालक व विद्यार्थ्यांची मने जिंकली.प्राचार्य डॉ. कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. ‘‘मी पुणे येथे प्राचार्य असताना उपेंद्र लिमये हा माझा विद्यार्थी होता. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला-गुणांची जाणीव शिक्षकाला असेल, तर उपेंद्रसारखे नवीन कलाकार भावी काळातही घडतील, असा विश्वास वाटतो,’’ असे ते म्हणाले.अहवाल वाचन प्रा. क्षितिजा गांधी यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी किरण गोरे यांनी आभार मानले.सामाजिक जाणीव, देशप्रेम व्हॉट्सअॅपवरच!अभिनय क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिकांसाठी आर्थिक देवाण-घेवाण होते का, वशिलेबाजी चालते का, अभिनेता होण्यासाठी काय करायचे, आपणास आवडलेली भूमिका कोणती आदी प्रश्नांची लिमये यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘शिक्षण पुण्यात झाले. मी बंडखोर विद्यार्थी होतो. वृत्तीही अभ्यासाची नव्हती. २५ वर्षांपूर्वी मॉर्निंग शोला जात होतो. सांस्कृतिक कार्यक्रमांत रस होता. त्यातूनच मी घडलो. या क्षेत्रात पुढे यायचे असेल, तर ज्यात आनंद मिळेल ते काम स्वीकारा. तारुण्यातली वर्षे चुकीच्या ठिकाणी वाया घालवू नका. तसे केले तर ध्येयापासून दूर जाल. दंगामस्ती तर कराच; पण शिक्षण घेत असतानाच पुढील आयुष्याचाही विचार करा. युवा पिढी मशिन होत चालली की काय, असे वाटते. सामाजिक जाणीव, देशावरील प्रेम व्हॉट्स अॅपवरच दाखवितो. कृती मात्र हव्या त्या प्रमाणात दिसत नाही.
छंद कसे जगायचे ते शिकवेल - उपेंद्र लिमये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:36 AM