पिंपरी : कोरोना संक्रमणामुळे दोन वर्ष ढोल-ताशा पथकांवर बंदी होती. मात्र आता दोन वर्षांनंतर पुन्हा शहरामध्ये ढोल ताशांचा निनाद घुमणार आहे. त्यासाठी मंडळे सज्ज झाली असून, अनेक मंडळांच्या दहा दिवसांच्या तिथी बुक झाल्या आहेत. या दहा दिवसांमध्ये मंडळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
यावर्षी कोरोना संक्रमणाची लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवामध्ये गणेशाच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशा पथकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरामध्ये ५० पथके आहेत. या मंडळांनी गेल्या तीन महिन्यांपासून सराव सुरू केला आहे. गणेशोत्सवामध्ये वाजवल्या जाणाऱ्या ढोल-ताशा पथकांची तरुणाईसह शालेय विद्यार्थ्यांना भुरळ पडली असल्याचे दिसून येते. तसेच यामध्ये तरुणींचा सहभाग आहे.
शहरातील प्रमुख मंडळांची सुपारी २ ते ५ लाख रुपयांच्या घरात आहे. तर साध्या मंडळांची सुपारी देखील ५० हजार रुपयांपासून पुढे आहे. दहा दिवसांच्या काळामध्ये एक मंडळ सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवितात. त्यानुसार शहरातील ५० मंडळे मिळून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या कालावधीमध्ये होते. शहरातील मंडळांना राज्यातील काना-कोपऱ्यातून मिरवणुकीसाठी सुपारी भेटत असते.
ढोल-ताशा पथकांची सुरुवात सरावासाठी जागा बघण्यापासून सुरू होते. त्यासाठी मोकळी जागा व शेड भाड्याने घेतली जाते. यासोबतच ढोल-ताशांची डागडुजी हा या पथकांचा मुख्य खर्च असतो. एका पथकात ६० ते ७० ढोल आणि ४० ते ५० ताशा असतात. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पथकांना दरवर्षी खर्च करावा लागतो. त्यामध्ये ढोल-ताशांची पाने बदलणे व पॉलिशिंग करणे आदी बाबींचा समावेश असतो. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळामध्ये पथकातील सदस्यांना चहा, नाश्ता, जेवण पुरवणे. शहराबाहेरील सुपारीसाठी घेऊन जाणे आदी खर्च करावा लागतो.
मंडळांकडून गरजू-गरिबांना आर्थिक मदत
शहरातील ढोल-ताशा पथकांकडून सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते. दहा दिवसांमध्ये मिळालेल्या उत्पन्नातून मंडळे पथकातील सदस्यांना शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी मदत करत असतात. तसेच जवळील अनाथ आश्रम, वृद्धाश्रमाला मदत करतात. त्यामधून काही पैसे ढोल-ताशांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील राखीव ठेवले जातात.
एका पथकाला दिवसात तीन सुपाऱ्या
छोट्या ढोल-ताशा पथकामध्ये ३० ते ५० सदस्यांचा समावेश असतो. तर मोठ्या पथकांमध्ये ही संख्या १०० च्या वर असते. अशी मंडळे एकाच दिवशी तीन ते चार ठिकाणी सुपारी घेतात. अशावेळी सदस्य विभागून गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीसाठी उपस्थित असतात.
शहरातील ढोल- ताशा पथकांना राज्यभरातून मागणी आहे. शहरामध्ये ५० ते ६० हजार रुपयांपासून सुपारी घेतली जाते. सर्व खर्च जाऊन पथकांना एकादिवशी १० ते २० हजार रुपये मिळतात. त्यामधून विविध उपक्रमासाठी मंडळे मदत करत असतात. - जुगनू भाट, संस्थापक अध्यक्ष, मोरया ढोल ताशा पथक, पिंपरी.